अभिनेता अक्षय कुमार यांच्या प्रॉडक्शन कंपनीतून बोलत असल्याचे भासवून चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष दाखवून तरूणीची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जुहू पोलिसांनी अटक केली. आरोपीने निर्भया प्रकरणावर आधारित चित्रपटात महत्त्वाची भूमिका देण्याचे आमिष दाखवले होते. पण तरूणीने अभिनेता अक्षय कुमारच्या स्वीय सहाय्यकाशी संपर्क साधल्यानंतर आरोपीचे बिंग फुटले.
तक्रारदार पूजा आनंदानी या खार येथील रहिवासी आहेत. त्यांना ३ एप्रिल रोजी एक दूरध्वनी आला होता. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने आपण अभिनेता अक्षय कुमारची कंपनी केप ऑफ गुड फिल्समधून रोहन मेहरा बोलत असल्याचे सांगितले. निर्भया प्रकरणाशी संबंधित चित्रपट येत असून त्यात महत्त्वाच्या भूमिकेसाठी आपले नाव अंतिम करण्यात आल्याचे त्याने सांगितले. तसेच त्याने पूजाला विलेपार्ले येथील इस्कॉन मंदिराजवळ भेटण्यासाठी बोलावले. भेटीच्या वेळी आरोपीने सोबत पटकथा लिहून आणली होती. खाली अभिनेता अक्षय कुमारची स्वाक्षरी असल्याचेही त्याने सांगितले.
