लोणीकंद पोलिस ठाण्यात दोन तरुणांनी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिस कर्मचाऱ्यांनी दोघांना वेळीच अटकाव केल्याने मोठा अनर्थ टळला. लोणीकंद पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री हा प्रकार घडला. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा करण्यात आला आहे.
लोणीकंद पोलिस ठाण्याच्या निरीक्षकाच्या (गुन्हे) हप्तेखोरीला कंटाळून आत्महत्येचा निर्णय घेतला, असा आरोप संबंधित तरुणांनी केला आहे. सत्यवान हौशीराम गावडे (वय ३४) आणि राम अशोकराव गजमल (वय २२, रा. उबाळेनगर, वाघोली) यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस कर्मचारी अमोल गायकवाड यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘उबाळेनगर परिसरात गावडे याच्या मालकीचे ‘न्यू प्यासा हॉटेल अँड बार’ आहे. रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवत असल्याने निरीक्षक (गुन्हे) सीमा ढाकणे यांनी सोमवारी पहाटे अडीच वाजता गावडेवर कारवाई केली. त्या रागातून गावडे आणि गजमल यांनी सोमवारी सायंकाळी लोणीकंद पोलिस ठाण्यात धिंगाणा घातला. त्यानंतर बाटलीतून आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.’
