दोन दिवस कमी दाबाने पाणी, मोरबे मुख्य जलवाहिनीवर आज १० तास देखभाल दुरुस्ती; नवी मुंबईसह कामोठे, खारघरलाही फटका

नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या जवळील भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र व मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत भोकरपाडा जलशुद्दीकरण केंद्र येथील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने १० तासांच्या देखभाल दुरुस्तीमुळे नवी मुंबई शहराबरोबरच मोरबे येथून पाणीपुरवठा होणाऱ्या कामोठे व खारघर परिसरांनाही याचा फटका बसणार आहे. त्यामुळे संपूर्ण नवी मुंबईसह खारघर व कामोठे भागांतही पाणीपुरवठा होणार नसून गुरुवारी सकाळीही कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे बुधवारी व गुरुवारी नागरिकांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.

मुंबईच्या तुलनेत नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणात ४९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. परंतू शहरातील नागरिकांना सुरळीत व सुव्यवस्थिपणे पाणीपुरवठा होण्यासाठी मोरबे धरणानजीकच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राजवळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर व्हॉल्व बसवण्यासाठी तब्बल १० तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे नवी मुंबई शहराबरोबरच खारघर व कामोठे या ठिकाणच्या भागांनाही मोरबे धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. या खारघर तसेच कामोठे भागातही सिडको नोडसाठी मोरबे धरणातून जवळजवळ ५० एमएलडी पाणीपुरवठा करते. त्यामुळे या विभागांनाही पाण्याबाबत खबरदारी घ्यावी लागणार आहे.

मोरबे धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नवी मुंबईत इतर शहरांच्या मानाने पाण्याची गंभीर समस्या जाणवत नाही. परंतू देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेतल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी मोठा अवधी लागतो. त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *