भारतासह संपूर्ण जगभरातील अनेक देशांमध्ये होळी हा सण साजरा केला जातो. पाकिस्तानही होळीची विशेष धूम पहायला मिळते. अशातच पाकिस्तानात होळी सेलिब्रेट करणाऱ्यांना चक्क 10-10 हजार रुपये दिले जाणार आहेत. पाकिस्तान सरकारने याबाबत घोषणा केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या या अनोख्या पॅकेजमुळे पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदू बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांत सरकारने हिंदू समुदायासाठी होळीच्या विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजअंतर्गत पंजाब प्रांतात राहणाऱ्या हिंदू कुटुंबांना होळी साजरी केल्यास 10,000 रुपये दिले जाणार आहेत. हे पैसे हिंदू बांधवांना चेकद्वारे दिले जाणार असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली. पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशातील हिंदू बांधवांना होळीच्या शुभेच्छा देताना या अनोख्या पॅकेजची घोषणा केली आहे.
काय आहे पाकिस्तान सरकारी योजना?
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात राहणाऱ्या जवळपास 700 हिंदू कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पाकिस्तानात राहणारे सर्वांधिक हिंदू नागरिक पंजाब प्रांतमध्येच राहतात. सामाजिक एकोपा वाढवावा हिंदू बांधवांना आपले सण कोणत्याही दबावाखाली न राहता साजरे करता यावेत यासाठी या पॅकेजची घोषणा करण्यात आल्याची माहिती सरकारने दिली. हिंदू समाजाचा आनंद वाढवण्यासाठी होळी पॅकेज अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 10,000 रुपयांचे धनादेश वितरित केले जातील असे पंजाब प्रांतच्या मुख्यमंत्री सचिवालयातर्फे सांगण्यात आले. पंजाब प्रांतचे मुख्यमंत्री मरियम नवाज यांनीही हिंदू समुदायाला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
