ठाण्यातील नागरिकांना हक्काचे पार्क मिळावे यासाठी बांधीव हस्तांतरण विकास हक्काच्या माध्यमातून कोलशेत भागात नमो सेंट्रल पार्क हे उद्यान विकसित करण्यात आले आहे. या सेंट्रल पार्कमध्ये नागरिक गर्दी करू लागले असल्याने वाहतुक कोंडी होऊन त्याचा फटका कोलशेत भागात वास्तव्य करणाऱ्या हजारो नागरिकांना बसू लागला आहे. सेंट्रल पार्कला जाण्यासाठी सर्वाधिक गर्दी शनिवारी आणि रविवारी असते. सुट्टीच्या दिवसांत देखील कोंडी होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. कोंडीमुळे परिसरात राहणारे नागरिक घराबाहेर पडणे टाळू लागले आहेत. ढोकाळी, हायलँड भागात देखील या वाहतुक कोंडीचा परिणाम पाहायला मिळत आहे.
शहरातील घोडबंदर प्रमाणे कोलशेत भागात मोठे गृहप्रकल्प उभे राहीले आहेत. त्यामुळे येथील कोलशेत गाव, हायलँड, ढोकाळी भागात मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढली आहे. येथील सदनिकांच्या किमती देखील कोटीच्या घरात गेल्या आहेत. असे असले तरी येथील ढोकाळी- कोलशेत रस्ता वाहतुकीच्या तुलनेत अरुंद आहे. त्यामुळे अनेकदा या मार्गावर चालकांना कोंडीचा सामना करावा लागत असतो. येथील पार्कसिटी गृहप्रकल्प परिसरात ठाणे महापालिकेला विकास प्रकल्पांतर्गत २०.५ एकरचा सुविधा भूखंड उपलब्ध झाला होता. त्यावर महापालिकेने बांधीव हस्तांतरण विकास हक्काच्या (कन्स्ट्रक्शन टीडीआर) माध्यमातून कल्पतरू विकासकाकडून नमो ग्रँड सेंट्रल पार्क हे उद्यान विकसित केले आहे. ८ फेब्रुवारीला या सेंट्रल पार्कचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
