या’ दिवशी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अशोक सराफ यांना होणार प्रदान

महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार,  येत्या गुरूवारी दिनांक २२ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ अभिनेते श्री. अशोक सराफ यांना मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तर मानाचा “गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार” ज्येष्ठ पार्श्र्वगायक श्री. सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांची व कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली.

वरळी येथील डोम, एनएससीआय ( नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया) येथे गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या ५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हे पुरस्कार माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात करण्यात येतील. या समारंभास केंद्रीय वाणिज्य मंत्री श्री. पीयूष गोयल, राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर, विधानसभा अध्यक्ष ॲड. श्री. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती श्रीमती नीलम गोऱ्हे, सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री श्री. दीपक केसरकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री तथा मुंबई शहर उपनगर पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.

नुकताच ज्येष्ठ अभिनेते श्री. अशोक सराफ यांना २०२३ साठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. राजकपूर जीवनगौरव पुरस्कार सन २०२० साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती अरुण इराणी, सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेते श्री. मिथुन चक्रवर्ती आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती हेलन यांना जाहीर झाला आहे तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी ज्येष्ठ दिग्दर्शक श्री. जे. पी. दत्ता, सन २०२१ साठी ख्यातनाम गायक श्री. सोनू निगम आणि सन २०२२ साठी श्री. विधू विनोद चोप्रा यांना जाहीर झाला आहे. या समारंभात त्यांना सन्मानपूर्वक हे पुरस्कार प्रदान केले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *