धर्मादाय रुग्णालयांकडून गरीब रुग्णांना मोफत उपचार देण्यास टाळाटाळ, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्याकडील १० टक्के खाटा गरीब रुग्ण आणि १० टक्के खाटा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र मुंबईतील जवळपास ८० पैकी अनेक धर्मादाय रुग्णालये गरीब व आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांवर मोफत अथवा सवलतीच्या दरात उपचार करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने यासंदर्भात रुग्णालयांना समज द्यावी, अन्यथा गरीब रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांसमोर आंदोलन करण्याचा इशारा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट १९५० अंतर्गत धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून संचालित होणाऱ्या रुग्णालयांना भूखंड, वीज, पाणी, इमारत बांधकामांमध्ये सवलती, आयात-निर्यात शुल्क माफी, आयकर सवलत आदी भरमसाठ सुविधा, अनुदान व सवलती सरकारमार्फत देण्यात येतात. त्याबदल्यात रुग्णालयाच्या क्षमतेच्या २० टक्के गरीब व आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरांत उपचार करणे बंधनकारक असते. मात्र मुंबईतील जवळपास ८० पैकी अनेक धर्मादय रुग्णालये गरीब व आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना मोफत अथवा सवलतीच्या दरामध्ये उपचार करण्यास टाळाटाळ करतात. उपचार टाळण्यासाठी ही रुग्णालये अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून प्रवेशाची प्रक्रिया किचकट व क्लिष्ट असल्याचे भासवतात. तसेच खाटा उपलब्ध नसल्याचे खोटे कारण देऊन ही रुग्णालये गरीब व आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना घाबरवून उपचार घेण्यापासून परावृत्त करतात, असा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. अशा रुग्णालयांवर कारवाई करावी, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी आरोग्य मंत्री, शहर व उपनगर जिल्हाधिकारी, तसेच धर्मादाय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. तसेच प्रशासनाने किंवा धर्मादाय रुग्णालयांनी उदासिनता दाखवल्यास मुंबई काँग्रेस सर्व रुग्णालायांसमोर आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

कोणाला उपचार घेता येतात

वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार रुपयांपर्यंत असलेले रुग्ण मोफत, तर वार्षिक उत्पन्न ३ लाख ६० हजार रुपयांपर्यंत असलेले रुग्ण सवलतीच्या दरात खाजगी धर्मादाय रुग्णालयात उपचार घेण्यास पात्र असतात. यासाठी रुग्णांना तहसिलदाराकडून मिळवलेला उत्पन्नाचा दाखला व शिधापत्रिका रुग्णालयास सादर करणे बंधनकारक असते.

या बाबींचे होते उल्लंघन

– बहुतेक खासगी धर्मादाय रुग्णालये आपल्या नामफलकांमध्ये धर्मादाय हा शब्दच नमुद करीत नाही.

– एकूण खाटांची क्षमता व गरीब रुग्णांसाठी राखीव खाटांची क्षमता नमूद असलेला फलक लावत नाहीत. – मोफत व सवलतीच्या दरात इलाजाबाबत अधिसूचना फलक दर्शनी भागात लावत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *