वांद्रे पूर्वेकडील सिद्धार्थ नगर येथील शिक्षक वसाहतीच्या बाजूला मंगळवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास भंगारातील गाड्यांना अचानक आग लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, जवळपास शेकडो गाड्या आगीत जळाल्याने वित्तहानी झाली.
शिक्षक वसाहतीबाजूच्या १ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेत भंगारात निघालेली अनेक वाहने उभी करण्यात आली होती. मंगळवारी सायंकाळी वाहनांना आग लागल्याचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान व पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्यास सुरुवात केली. काहीच क्षणात आगीने शेकडो गाड्यांना घेराव घातला. या भीषण आगीत जवळपास १५० गाड्या जळून खाक झाल्या. आगीची तीव्रता लक्षात घेऊन सायंकाळी ६ वाजून ४१ मिनिटांनी अग्निशमन दलाकडून आगीला क्रमांक एकची वर्दी देण्यात आली.
