नीलगाय आडवी आल्याने अनर्थ, समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, १२ प्रवासी गंभीर जखमी

नीलगाय आडवी आल्याने खासगी ट्रॅव्हल्स ट्रकला धडकून भीषण अपघात झाल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील कार्ली गावाजवळ समृद्धी महामार्गावर लोकेशन १७३ जवळ रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात जवळपास २२ प्रवासी जखमी झाले असून त्यातील १० ते १२ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.

नागपूरवरुन पुण्याला प्रवासी घेऊन जात असताना एका खासगी ट्रॅव्हल्ससमोर असलेल्या ट्रकच्या पुढे नीलगाय आडवी आल्याने ट्रक चालकाने नीलगाईला वाचवण्यासाठी तात्काळ ब्रेक दाबला. त्याचदरम्यान, मागून येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाला, असल्याचं सांगण्यात येत आहे. पूजा कंपनीची खासगी ट्रॅव्हल्स नागपूरवरुन पुणे येथे जात असताना वाशिम जिल्ह्यातील दोनद ते कारंजा दरम्यान कार्ली गावाजवळ समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच कारंजा येथील गुरुदेव मंदिराच्या रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचून जखमींना तात्काळ कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी २२ प्रवाशी जखमी झाले असून त्यातील १० ते १२ प्रवाशी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. तर ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसानही झाले आहे. समृद्धी महामार्गावर जंगली प्राणी रस्ता ओलांडताना बरेच अपघात यापूर्वी सुद्धा झाले आहेत. समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे ही मालिका कमी करण्यासाठी जंगली प्राणी समृद्धी महामार्गावर येणार नाहीत यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *