वाटलं होतं दगडाची जखम, मात्र तपासणीत आढळली गोळी

महाविद्यालयीन विद्यार्थी दुचाकीवरुन जात असताना हाताच्या दंडातून अचानक रक्तस्त्राव होऊ लागला. मित्राला बोलाऊन तो रुग्णालयात गेला. डॉक्टरांनी एक्सरे काढून पाहिले असता दंडात गोळी असल्याचे निदर्शनास आले. अज्ञाताकडून झालेल्या गोळीबारात तो जखमी झाल्याची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सांगली शहरातील जुना बुधगाव रस्त्यावरील रेल्वे फाटकाजवळून प्रवास करताना रत्नजीत विजय पाटील (वय २०, रा. होळीचा टेक, कवलापूर, ता. मिरज) हा जखमी झाला. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.दंडाला जखम झाल्याने तो उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला. मात्र, आपल्यावर गोळीबार झाला आहे, हेच त्याला कळले नव्हते. रस्त्यावरील एखादा खडा चाकामुळे वर उडून लागला असावा असे त्याला वाटले. मित्राला सोबत घेऊन तो रुग्णालयात गेला असता डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत त्याच्या उजव्या हाताच्या दंडात गावठी बंदुकीची गोळी घुसल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र, नेमका गोळीबार कोणी केला, हे अद्याप समोर आले नाही. जखमी रत्नजीतवर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. मिरजेतील एका महाविद्यालयात पदवीच्या पहिल्या वर्षात शिकण्यास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *