नागपाडा पोलीस रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून ३९ वर्षीय पोलिसाने शनिवारी आत्महत्या केली. ते स्थानिक सशस्त्र पोलीस-३ येथे कार्यरत होते. नुकतीच त्यांची माहिम पोलीस ठाण्यावरून तेथे बदली करण्यात आली होती.
कैलास एकनाथ गवळी असे मृत पोलिसाचे नाव आहे. माहिमवरून त्यांची वरळी येथील एल-३ विभागात कार्यालयात बदली करण्यात आली होती. त्या काळात ते ८९ दिवस गैरहजर असल्यामुळे तंदुरुस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र मागण्यात आले होते. त्यासाठी त्यांना नागपाडा पोलीस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी ते रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील शौचालयात गेले. तेथील खिडकीतून त्यांनी खाली उडी मारली. त्यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यामुळे त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान गवळी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी गवळी यांच्या पत्नीचा जबाब नोंदवला आहे.
