मुंबई: डोक्याला चेंडू लागून क्रिकेटपटूचा मृत्यू

माटुंगा येथे क्रिकेट सामन्यादरम्यान डोक्याला चेंडू लागल्यामुळे ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. जयेश चुन्नालाल सावला (५२) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो भाईंदर येथील रहिवासी आहे. याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

माटुंगा पूर्व येथील दडकर मैदानात सोमवारी कच्छी समाजाची क्रिकेट मालिका सुरू होती. त्यावेळी सामन्यादरम्यान सावला क्षेत्ररक्षण करीत होते. त्यावेळी बाजूच्या खेळपट्टीवर क्रिकेट सामना सुरू असताना फलंदाजाने टोलवलेला चेंडू डोक्याला लागल्यामुळे सावला खाली पडले. त्यांना तात्काळ लायन ताराचंद रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून सावला यांना मृत घोषित केले. ५० वर्षांवरील व्यक्तीसाठी हे सामने आयोजित करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *