अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर कोणतीही मुस्लिम व्यक्ती नको, असे वादग्रस्त विधान रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार बेन कार्सन यांनी केले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असतानाच कार्सन यांच्या या वादग्रस्त विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे.
एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान कार्सन यांनी हे वादग्रस्त विधान केले. मुस्लिम व्यक्ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी लायक नाही. त्यामुळे या पदासाठी आपण मुस्लिमांना समर्थन करू शकत नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची श्रद्धा ही या देशाच्या राज्यघटनेच्या विरोधी असता कामा नये, असे स्पष्ट मत कार्सन यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
दरम्यान, राष्ट्रपदीपदाचे दुसरे उमेदवार डोनाल्ड ड्रम्प यांनी प्रचारादरम्यान मुस्लिमांविषयी आपुलकीची भावना व्यक्त केली होती. तसेच निवडणूक जिंकल्यास मुस्लिम व्यक्तीचा कॅबिनेटमध्ये समावेश करण्याची घोषणाही ड्रम्प यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर कार्सन यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी वादग्रस्त विधान करून खळबळ उडवून दिली. त्यामुळे राष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीत हा मुद्दा चांगलाच गाजण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, कार्सन यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर विविध स्तरामधून टीका करण्यात येत आहे.

