कोकणातील कातळशिल्पांवर आधारित नाणे संकल्पनेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

जपान मिंटच्या आंतरराष्ट्रीय नाणे संकल्पना स्पर्धेत शिल्पकार मुकेश पुरो यांना पुरस्कार

मुंबई : जपान सरकारच्या ‘जपान मिंट’ या स्वतंत्र प्रशासकीय संस्थेतर्फे आयोजित ‘आंतरराष्ट्रीय नाणे संकल्पना स्पर्धा २०२३’मध्ये मुंबईतील गिरगाव येथील मुंबई कला महाविद्यालयाचे प्राचार्य व शिल्पकार मुकेश पुरो यांची ‘फाईन मास्टर आर्टिस्ट’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मुकेश पुरो यांनी कोकणातील रत्नागिरी येथील कातळशिल्पांवर आधारित नाणे साकारले आहे.

मुकेश पुरो यांनी नाण्याच्या एका बाजूस रत्नागिरीतील रूधेताळी गावातील यंत्राशी संबधित कातळशिल्प आणि दुसऱ्या बाजूस कशेळी गावातील भव्य हत्तीचे कातळशिल्प कोरले आहे. नाण्याचे आकारमान हे १२ सेंटीमीटर व्यास आणि उत्थित शिल्पाची जाडी ही २ मिलीमीटर आहे. हे नाणे साकारण्यासाठी पुरो यांना सलग दोन महिन्यांचा कालावधी लागला. जपान सरकारच्या ‘जपान मिंट’ या संस्थेतर्फे दरवर्षी आंतरराष्ट्रीय नाणे संकल्पना स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. जगभरातील हजारो शिल्पकार या स्पर्धेत सहभाग घेऊन विविध विषयांवर आधारित नाणे साकारत असतात. २०२३ सालासाठी झालेल्या स्पर्धेत मुंबईतील मुकेश पुरो यांनीही सहभाग घेतला. प्रथम जुलै महिन्यात त्यांनी संकल्पना मांडली, त्यानंतर संबंधित रेखाचित्र पाठविले आणि त्यानंतर स्पर्धेसाठी त्यांची निवड झाल्याचे त्यांना सप्टेंबर महिन्यात सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी कातळशिल्पावर आधारित नाणे साकारण्यास सुरुवात केली. ‘कोकणातील ‘कातळशिल्पे’ ही जगाच्या पाठीवर सर्वांपर्यंत पोहोचावी आणि आपल्या संस्कृतीचा अभ्यास सर्वांना करता यावा. त्यामुळे कोकणात जगभरातील पर्यटक व अभ्यासक येऊन स्थानिक लोकांना रोजगार प्राप्त होईल, हा माझा मुख्य उद्देश होता आणि म्हणूनच मी आंतरराष्ट्रीय नाणे संकल्पना स्पर्धेसाठी कातळशिल्पे हा विषय निवडला’, असे मुकेश पुरो यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *