सातारा : जवान अनिल कळसे शहीद, झाड अंगावर कोसळून झाली दुर्घटना

कराड तालुक्यातील रेठरे खुर्द गावचे सुपुत्र जवान अनिल कळसे हे बुधवारी मणिपूरमध्ये देशसेवा बजावत असताना शहीद झाले. त्यांचे पार्थिव उद्या शनिवारी (दि. २३) सकाळी रेठरे खुर्द येथे आणण्यात येईल आणि शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जवान अनिल कळसे हे मणिपूर येथे सैन्यदलात हवालदार म्हणून देशसेवा बजावत होते. त्यांच्या अंगावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, लहान मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, जवान अनिल कळसे शहीद झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या कुटुंबीयांसह रेठरे खुर्द पंचक्रोशी शोकसागरात बुडाली.

अनिल कळसे हे २९ सप्टेंबर २००० रोजी सैन्यदलात भरती झाले. २०१७ साली ते सैन्यातून निवृत्त झाले. परंतु, त्यांनी सेवा वाढवून घेतली. पुढील वर्षी ऑगस्टमध्ये ते सेवेतून निवृत्त होणार होते. सध्या ते बॉम्बे इंजिनियर ग्रुपमधील २६७ इंजिनिअर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. त्यांनी अतुलनीय कामगिरी करून रेजिमेंटचा लौकिक वाढवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *