मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाला बाजारातील दुकानांमधून औषध खरेदी करावे लागू नये यासाठी १५ जानेवारीपासून सर्व रुग्णालयांमध्ये शुन्य वैद्यकीय चिठ्ठी योजना लागू करण्यात येणार आहे. यामुळे महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर सर्व उपचार मोफत होणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये शुन्य वैद्यकीय चिठ्ठी योजना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार या योजनेची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू असून, महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये १५ जानेवारीपासून ही योजना लागू करण्यात येणार आहे. ही योजना लागू झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी एकही रुपया खर्च करावा लागणार नाही. सर्व उपचार मोफत होतील, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी दिली.
