दरवर्षी हिवाळा सुरू होताच नेरूळमधील पामबीच रस्त्यावरील डीपीएस तलावात मोठ्या संख्येने फ्लेमिंगोचे थवे डेरेदाखल होतात. फ्लेमिंगोंच्या आकर्षणापोटी अनेक पर्यटक आणि अभ्यासक या काळात डीपीएस तलावर परिसराला भेट देतात. त्यामुळे फ्लेमिंगोंच्या संरक्षणाची बाब लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने आता डीपीएस तलावाला कुंपण घातले आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पाणथळ क्षेत्रात मुबलक अन्न उपलब्ध होत असल्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांचा तेथे वावर आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत नवी मुंबई ‘फ्लेमिंगो सिटी’ म्हणून ओळखली जावू लागली आहे. परिणामी, पर्यटक तसेच पक्षी निरक्षकांची तेथे गर्दी वाढू लागली आहे. स्थलांतरित पक्षी बघण्यासाठी पर्यटक, पक्षी निरीक्षक तलाव परिसरात गर्दी करीत असून उडणाऱ्या पक्ष्यांची छायाचित्रे टिपण्यासाठी काही जण त्यांच्या दिशेने दगड भिरकावतात. त्यामुळे फ्लेमिंगोंना इजा होण्याची शक्यता असते, असा मुद्दा पक्षी प्रेमींनी उपस्थित केला आहे.
