प्रसिद्ध चित्रकारांची चित्र असल्याचे भासवून ५२ वर्षीय व्यक्तीची सुमारे १८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ताडदेव पोलिसांनी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे असल्याचे भासवून तक्रारदारांना ११ चित्रांची विक्री करण्यात आली होती. तज्ज्ञांनी केलेल्या तपासणीत तक्रारदारांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले.
ताडदेव येथे राहणारे पुनीत भाटिया (५२) गुंतवणूकदार असून ते इन्वेस्टमेंट म्हणून काम करतात. मित्राच्या २०२२ मधील पार्टीमध्ये त्यांची एका व्यक्तीसोबत ओळख झाली होती. मध्य प्रदेशातील राजेश राजपाल याच्यामार्फत प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे मिळवून देण्याचे आश्वासन त्याने दिले. या व्यक्तीने २३ जानेवारी २०२३ रोजी भाटिया यांच्याशी संपर्क साधला. प्रसिद्ध चित्रकार मनजीत बावा यांचे कृष्णाचे चित्र निवृत्त सनदी अधिकारी सुब्रता बॅनर्जी यांच्याकडे असून त्याची किंमत सहा कोटी ७५ लाख रुपये असल्याचे त्याने भाटिया यांना सांगितले. तसेच आणखी एका प्रसिद्ध चित्रकाराच्या नाव सांगून पावणेदोन कोटी रुपयांचे चित्र भाटिया यांना दाखवण्यात आले. भाटिया यांनी दोन्ही चित्रे खरेदी केली. त्यानंतर विविध चित्रकारांचे नाव सांगून राजपाल याच्याकडून भाटिया यांनी ११ चित्रे खरेदी केली. भाटिया यांनी त्यासाठी धनादेशांद्वारे १७ कोटी ९० लाखांची रक्कम दिली.
