सरकारकडून बेरोजगारांची थट्टा : आमदारांनी विधानभवनाच्या पायरीवर तळली भजी

विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या सातव्या दिवशी विरोधकांनी बेरोजगारांची थट्टा करणाऱ्या सरकारचा निषेध करत विधानभवन परिसरात प्रतिकात्मक भजी तळली. यावेळी सत्ताधाऱ्यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

महाविकास आघाडीतील आमदारांनी ‘पेपरफुटी झाली, काय दिवे लावले’, ‘भरतीची घोषणा, काय दिवे लावले’, ‘बेरोजगारी वाढली, काय दिवे लावले,’ ‘पीएचडीधारकांची थट्टा, काय दिवे लावले’, अशा घोषणा देत शुक्रवारी विधानभवन परिसर दणाणून सोडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘पीएचडी करून काय दिवे लावणार’ असे वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली. त्यांचे वाक्य बरेच ट्रोल झाले. त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच माझ्या बाजूने हा विषय संपल्याचे जाहीर केले आहे. मात्र, विरोधकांनी त्यांच्या ‘काय दिवे लावले’ या वाक्याला धरून शुक्रवारी बेरोजगारीच्या मुद्द्यावर जोरदार आंदोलन केले. यावेळी आंदोलनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, रवींद्र धंगेकर, सचिन अहिर, सतेज पाटील, रोहित पवार, के. सी. पाडवी आदींचा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *