राज्यातील पहिला ‘हत्ती कॅम्प’ वनखात्याला नकोसा! हत्ती हलविण्याच्या हालचालींना पुन्हा वेग

राज्यातील पहिला आणि एकमेव हत्ती कॅम्प नकोसा झाल्याचे पुन्हा एकदा वनखात्याने दाखवून दिले आहे. दोन वर्षांपूर्वी या हत्ती कॅम्पमधील हत्ती परराज्यात पाठवण्याचा घाट खात्याने घातला होता. स्थानिकांच्या एकजुटीने हा डाव मोडीत निघाला. मात्र, आता पुन्हा एका व्याघ्रप्रकल्पात नव्याने होऊ घातलेल्या हत्ती कॅम्पमध्ये हत्ती हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक याबाबत कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त कमलापूर येथे गेल्या ५५ वर्षांपासून असलेल्या शासकीय हत्ती कॅम्पमध्ये सध्या दोन नर व सहा मादी हत्तींसह एकूण आठ हत्ती आहेत. दरम्यानच्या काळात काही हत्ती मृत्युमुखीदेखील पडले. जंगलातील लाकडे वाहून नेण्याचे काम हे हत्ती करत असतानाच या हत्तींना पाहण्यासाठी पर्यटकांचीदेखील मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मात्र, पर्यटनासाठीच्या सोयीसुविधा तर दूरच राहिल्या, पण हत्तींच्या देखभालीसाठीदेखील सुविधांकडेही शासनाचे दुर्लक्ष आहे. याउलट येथून हत्ती इतरत्र कसे पाठवता येतील, यादृष्टीनेच हालचाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *