पेणच्या गणेशमूर्तीना अखेर भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारच्या स्वामित्व विभागाने याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे पेणच्या गणेशमूर्तीना खऱ्या अर्थाने राजाश्रय प्राप्त होणार आहे.
‘ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी’च्या मदतीने पेण येथील गणेश मूर्तिकार आणि व्यावसायिक मंडळाने भौगोलिक मानांकनासाठी (जीआय) रायगड जिल्ह्यातील पेण येथील गणेशमूर्तीचा प्रस्ताव चेन्नई येथील भौगोलिक मानांकन नोंदणी कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. त्यास मान्यता मिळाली आहे. मानांकन मिळविण्यासाठी देशभरातील ३५ उत्पादनांचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते. त्यापैकी १३ उत्पादने महाराष्ट्रातील होती. यात पेण येथील गणेशमूर्तीचा समावेश होता. त्यास मान्यता मिळाल्याने पेणच्या गणेशमूर्ती व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पेण येथील गणेशमूर्तीना बिगर कृषी घटकात भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. २९ नोव्हेंबरच्या रोजी प्रसिद्ध झालेल्या केंद्र सरकारच्या ‘पेटंट जर्नल’मध्ये ते प्रसिद्ध झाले आहे.
– गु. श. हरळय्या, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र रायगड
पेणच्या गणेशमूर्ती नावाखाली भाविकांना सर्रास कोणत्याही भागातील मूर्ती विकण्यात येत होत्या. भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे या प्रकारांना आळा बसेल.
– श्रीकांत देवधर, अध्यक्ष पेण गणेश मूर्तिकार व्यावसायिक संघटना
