दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या खासगी सचिवाने स्वत:च्या नावामागे सिंधुताईंचे नाव लावून त्यांचा वारस होण्याचा प्रयत्न चालवला आहे, असा आक्षेप सिंधुताई सपकाळ यांचे पुत्र अरूण सपकाळ यांनी घेतला आहे. या प्रकरणी त्यांनी अचलपूर येथील न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
सिंधुताई सपकाळ यांचे खासगी सचिव विनय नितवणे हे पुण्यातील संस्थेचा कारभार पाहतात. सिंधुताई सपकाळ यांचे ४ जानेवारी २०२१ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर विनय नितवणे यांनी स्वत:च्या नावात बदल करून राजपत्राद्वारे नावामागे सिंधुताई सपकाळ यांचे नाव लावले आहे. जी मुले अनाथ आहेत, अशाच मुलांच्या नावांमागे सिंधुताई सपकाळ यांचे नाव लावले जाते. मात्र, विनय नितवणे हे अनाथ नाहीत, तरीही त्यांनी आपल्या आईचे नाव लावले आहे. त्यांच्या नावाचा दुरूपयोग होण्याची शक्यता असल्याने आपण न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला, असे अरूण सपकाळ यांनी सांगितले.
