अन् देशभरात सायरन वाजू लागले; इस्रायलकडून युद्धाची घोषणा, पॅलेस्टाईनकडून रॉकेट्सचा वर्षाव

पॅलेस्टाईनमधील दहशतवाद्यांनी लष्करी कारवाई असा उल्लेख करत इस्त्रायलवर रॉकेटने हल्ला केला आहे. गाझा पट्टीवरुन हे रॉकेट्स इस्त्रायलवर डागण्यात आले. यानंतर इस्त्रायलने युद्धाची घोषणा केली आहे. रॉकेट्स हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून, दोन जखमी झाले आहेत. दरम्यान, इस्त्रायलने नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याची सूचना केली आहे.

पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये घुसखोरी करत डझनभर रॉकेट़ डागले असता एका महिलेचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे. गाझा पट्टीतून झालेल्या रॉकेट हल्ल्यांनंतर इस्रायलला युद्धाची स्थिती घोषित करावी लागली आहे. इस्रायल लष्कारने दिलेल्या माहितीनुसार, “बरेच दहशतवादी इस्रायलच्या हद्दीत घुसले आहेत”. सोशल मीडियावर काहींनी व्हिडीओ शेअर केले असून सीमावर्ती शहर Sderot येथे गणवेश घातलेला बंदूकधारी दिसत आहेत. व्हिडिओंमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहे. पण या व्हिडीओंची सत्यता पडताळण्यात आलेली नाही.

सकाळी उत्तरेकडे सुमारे 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या तेल अवीवपर्यंत, गाझामध्ये हवेतून उड्डाण करणाऱ्या रॉकेटचे आणि सायरन ऐकू येत होते. इस्रायलच्या मॅगेन डेव्हिड अडोम बचाव संस्थेने सांगितले की, दक्षिण इस्रायलमधील एका इमारतीवर रॉकेट आदळल्याने 70 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. तसंच 20 वर्षांचा तरुणही जखमी झाला आहे.

संपूर्ण दक्षिण आणि मध्य इस्रायलमध्ये रॉकेट हल्ले सुरू असल्याने लाखो नागरिकांना त्यांच्या घरांमध्येच राहण्याची सूचना करण्यात आली आहे. गाझाच्या शेजारी असलेल्या रहिवाशांनी त्यांच्या घरातच राहावे असं लष्कराने सांगितलं आहे.

हमासच्या लष्करी शाखेचा नेता मोहम्मद देईफ याने सशस्त्र गटाने इस्रायलविरुद्ध नवीन लष्करी कारवाई सुरू केली असल्याचं म्हटलं आहे. मोहम्मद डेफने सांगितलं आहे की, “ऑपरेशन अल-अक्सा स्टॉर्म” सुरू करण्यासाठी शनिवारी पहाटे 5000 रॉकेट इस्रायलवर डागण्यात आले. आता पुरे झालं असा संदेश आम्हाला द्यायचा आहे. यावेळी त्याने पॅलेस्टाइन नागरिकांना इस्रायलचा सामना करण्याचं आवाहन केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *