बेस्ट उपक्रमातील ओपन डेक बसची शेवटची मुंबई दर्शन फेरी

देशविदेशातून येणाऱ्या पर्यटकांना मुंबईतील प्रमुख स्थळे दाखवण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडून चालवण्यात येणाऱ्या ओपन डेक बसची शेवटची मुंबई दर्शन फेरी गुरूवारी धावली. त्यानंतर ही बस सेवानिवृत्त होईल. तसेच, बेस्टच्या ताफ्यात १० वातानुकूलित ओपन डेक बस लवकरच दाखल होणार आहेत.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने १९९७ साली दुमजली खुली बस (ओपन डेक डबलडेकर) सुरु झाली. दोन दशकांहून अधिक काळ या बस मुंबई दर्शनासाठी धावत होत्या. मंत्रालय, विधानभवन, सीएसएमटी, महापालिकेची इमारत, हुतात्मा चौक, रिझर्व्ह बँक, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, एशियाटिक लायब्ररी, ओल्ड कस्टम हाउस, एनसीपीए, मरीन ड्राईव्ह यांसह मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांचे सौंदर्य पर्यटकांना अनुभवता आले. गिरगाव चौपाटी, चर्चगेट स्थानक, ओव्हल मैदान, उच्च न्यायालय, आणि मुंबई विद्यापीठ या ठिकाणांना भेट देता आली. मात्र निलांबरी नाव असलेल्या ओपन डेक बसला १५ वर्षे पूर्ण झाल्याने ती सेवानिवृत्त झाली आहे. आता मुंबई दर्शनासाठी बेस्टच्या नव्या वातानुकूलित दुमजली ओपन डेक बस खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे, असे बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *