शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई विरोधातील आंदोलनाच्या गुन्ह्यातून मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह भगवान वाल्हेकर, भाजपाचे एकनाथ पवार, नामदेव ढाके यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा १२ वर्षांपूर्वी ऐरणीवर आला होता. महापालिका प्रशासनाने बांधकामांवर हातोडा घालण्यास सुरुवात केली होती. शहरातील नागरिक, कष्टकऱ्यांवर बेघर होण्याची वेळ आली होती. या कारवाईविरोधात मुंबई, नागपूर विधानभवनावर भव्य मोर्चा काढला होता. महापालिका, तसेच तत्कालीन प्राधिकरण कार्यालयावरही मोर्चे काढले होते. महामार्ग रोखणे, गर्दी जमवणे, गर्दीचे नेतृत्व करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे याप्रकरणी खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह शिवसेनेचे तत्कालीन शहरप्रमुख भगवान वाल्हेकर, भाजपाचे एकनाथ पवार, नामदेव ढाके यांच्यावर मावळ, पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते.
