मुंबईतील कुर्ला भागातील एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या 39 रहिवाशांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि सुमारे 50-60 जणांना सुखरूप बाहेर काढले. आग पूर्णपणे आटोक्यात आली असून आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला पश्चिम भागातील कोहिनूर हॉस्पिटलजवळील एसआरए इमारतीत ही आग लागली. अग्निशमन विभागाने ही आग लेव्हल-1ची असल्याची माहिती दिली. ही आग तळमजल्यापासून 12व्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, इलेक्ट्रिक डक्टमधील स्क्रॅप मटेरियल इत्यादींपर्यंतच ही आग मर्यादित होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहिती पालिकेने दिली. आगीच्या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये रात्रीच्या आभाळात दाट काळा धूर पसरलेला दिसत आहे.
आगीमुळे गुदमरल्याचा त्रास झाल्यामुळे 39 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 39 जणांपैकी 35 जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. तर इतर चार जणांना कोहिनूर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना वैद्यकीय मदत मिळाल्यानंतर घरी सोडण्यात आले.
