म्हाडाने अनेक प्रकल्प हाती घेतले असून या प्रकल्पांसाठी म्हाडाला मोठ्या निधीची नितांत गरज आहे. एकीकडे निधीची गरज, तर दुसरीकडे गंगाजळीचा तुटवडा अशा कात्रीत म्हाडा अडकले आहे. त्यामुळे धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत १६९० घरांच्या बांधकामासाठी खर्च केलेले ६४२ कोटी रुपये वसूल करण्याचे प्रयत्न म्हाडाच्या मुंबई मंडळाने सुरू केले आहेत. घरांच्या बांधकामापोटी आलेल्या खर्चाची रक्कम परत मिळावी, अशी मागणी मंडळाने धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडे (डीआरपी) केली आहे.
