पाच हजार ८७७ वाहनचालकांचा झाला थकीत दंड कमी… उद्या पुन्हा एक संधी; जाणून घ्या अधिक माहिती

वाहतूक नियमभंगाच्या थकीत दंड प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या मदत केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत पाच हजार ८७७ वाहनचालकांचा दंड कमी करण्यात आला. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियम उल्लंघनाचे थकीत खटल्यांचा निपटारा करण्यासाठी शनिवारी (९ सप्टेंबर) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकअदालतीचे कामकाज शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरु होणार आहे. वाहतूक नियमभंगाच्या थकीत दंडाचे प्रमाण मोठे आहे. थकीत दंडाची रक्कम कमी करणे, तसेच वाहनचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेकडून २८ ऑगस्टपासून वाहनचालकांसाठी मदत केंद्र (हेल्प डेस्क) सुरू करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत मदत केंद्राचे कामकाज सुरू राहणार आहे. आतापर्यंत पाच हजार ८७७ वाहनचालकांवरील थकीत दंड कमी करण्यात आला आहे.

प्रलंबित खटला, थकीत दंडाची रक्कम कमी करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. वाहनचालकांना दंडाच्या रकमेतून सूट देण्यात येणार आहे. मदत केंद्रात न्यायालयातील पॅनल असणार आहे. मदत केंद्रात थकीत दंड कमी करून घेण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांनी आधारकार्डची झेराॅक्स प्रत आणावी, असे आवाहन वाहतूक पोलीस आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

लोकअदालतीत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

लोकअदालतीत जास्तीत जास्त खटल्यांचा निपटारा करण्यासाठी १९ न्यायदंडाधिकारी, सहकारी उपस्थित राहणार आहेत. येरवडा येथील वाहतूक शाखेचक्या कार्यालयात शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून कामकाज सुरू करण्यात येणार आहे. १९ मदत केंद्र तेथे असणार आहेत. प्रथम येणाऱ्या वाहनचालकास प्राधान्य देण्यात येणार आहे. वाहनचालकांना टोकन देण्यात येणार आहे. मदत केंद्राद्वाारे आतापर्यंत वाहनचालकांना दंडाच्या रक्कमेतून ५० टक्के सवलत देण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *