हरियाणामधील गिधाडे लवकरच विदर्भात

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या (बीएनएचएस) हरियाणा येथील पिंजोरमधील २० गिधाडांच्या जोड्या विदर्भात नेण्यात येणार आहेत. विदर्भातील ताडोबा, पेंच, अंधारी आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पांत ही गिधाडे सोडण्यासाठी बीएनएचएसने पुढाकार घेतला आहे.

सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम गिधाडे करतात. मात्र, गिधाडांची संख्या झपाट्याने कमी होऊन जैवविविधतेचे चक्र बिघडत आहे. गिधाडांच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी ‘बीएनएचएस’ने हरियाणा आणि भोपाळ येथे प्रजनन केंद्रे उभारली आहेत. हरियाणातील पिंजोर केंद्रामधील गिधाडांच्या २० जोड्या विदर्भात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहेत. या २० जोड्यांची निवड अद्याप करण्यात आलेली नाही. स्थानांतरणाची तारीख निश्चित झाल्यावर गिधाडांची निवड करण्यात येणार आहे.

गिधाडांना नैसर्गिक अधिवासात सोडताना ठरावीक प्रक्रिया करण्यात येते. गिधाडांचे स्थलांतर केल्यानंतर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यापूर्वी विशिष्ट प्रकारच्या पिंजऱ्यात ठेवण्यात येणार आहे. ताडोबा, अंधारी, पेंच आणि मेळघाट या ठिकाणी नैसर्गिक अधिवास तयार करण्यात येणार असून त्याचे काम सुरू आहे‌. गिधाडांच्या २० जोड्यांची निवड करून त्यांना कलर टॅग आणि पी.टी.टी. जोडून सोडण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *