करोना काळात जो लॉकडाऊन लागला त्यानंतर बालविवाह वाढले आहेत असा दावा रुपाली चाकणकर यांनी केला. महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लातूरमध्ये एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. तिथे त्यांनी हा दावा केला. मोबाइल फोनच्या अतिवापरामुळे अनेकांचं अभ्यासावरुनही लक्ष उडालं आहे. मोबाइल फोनमुळे आई-वडील आणि मुलांमधला संवाद संपला आहे असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे रुपाली चाकणकर यांनी?
“आई वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये संवाद संपला आहे. यामुळेच मुली प्रेमात पडून घरातून पळून जाऊ लागल्या आहेत. करोना काळात प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन लावण्यात आला होता. या काळात महाराष्ट्रात बालविवाह वाढले.” लातूरच्या एका संमेलनात त्यांनी हे मत व्यक्त केलं.
लातूरमध्ये रुपाली चाकणकर म्हणाल्या एकटा लातूर जिल्हा असा आहे जिथे ३७ बालविवाह रोखले गेले. महाराष्ट्रात बालविवाहांचं प्रमाण वाढलं आहे असं रुपाली चाकणकर म्हणाल्या पण त्यांनी ठराविक कुठलीही आकडेवारी सादर केली नाही. गावांमध्ये जेव्हा ग्रामसभा घेतल्या जातात तेव्हा बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजनांवर चर्चा झाली पाहिजे. आई वडिल आणि मुलांमध्ये जो संवाद संपला आहे त्यामुळे अनेकदा मुली घर सोडून जातात असंही समोर आलं आहे. प्रेमात पडतात, घर सोडून पळून जातात असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या.
