काँग्रेसचे पाच माजी नगरसेवक शिंदे गटात, धारावी मतदार संघाला खिंडार

मुंबईत ठाकरे गटापाठोपाठच आता काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसच्या पाच माजी नगरसेवकांनी शनिवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. हे पाचही नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे हे पाचही नगरसेवक मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या धारावी मतदारसंघातील आहेत.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या वर्षभरात मुंबईतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी एक एक करत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आतापर्यंत पंधराहून अधिक माजी नगरसेवक शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. शिंदे यांच्या गटाने आता मुंबईतील काँग्रेसची ताकद कमी करण्याकडे मोर्चा वळवला आहे. काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला. त्यात शीव कोळीवाडा येथील माजी नगरसेविका पुष्पा कोळी, चांदिवलीतील वाजिद कुरेशी, धारावीतील भास्कर शेट्टी, बब्बू खान, कुणाल माने यांचाही समावेश आहे. हे पाचही माजी नगरसेवक मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या मतदार संघातील आहेत. गायकवाड यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचे या माजी नगरसेवकांनी म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसला निवडणूकीच्या तोंडावर मोठा फटका बसला आहे. तर काँग्रेसच्या अंधेरीतील माजी नगरसेविका सुषमा राय यांनी आधीच शिंदे गटात प्रवेश केला आहे.

दरम्यान, ठाकरे गटातून शिवसेनेत आतापर्यंत सुमारे पंधरा माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. पालिकेची निवडणूक जाहीर होईपर्यंत मोठ्या संख्येने माजी नगरसेवक शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली आहे. शिंदे गटाला मुंबईत आपले बस्तान बसवण्यासाठी जिंकून येणाऱ्या उमेदवारांची जमवाजमव करावी लागणार आहे. त्याचीच तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. आतापर्यंत यशवंत जाधव, शीतल म्हात्रे, समाधान सरवणकर, संतोष खरात, दिलीप लांडे, परमेश्ववर कदम, आत्माराम चाचे, वेशाली शेवाळे, भारती बावदाने, मानसी दळवी, अमेय घोले, किरण लांडगे, चंद्रावती मोरे, सुवर्णा करंजे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्यावर्षीच धनश्री भरडकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *