अपहरण झालेल्या पाच वर्षांच्या मुलीची सुटका, ४८ तासांत आरोपीला पकडण्यात जुहू पोलिसांना यश

पाच वर्षांच्या मुलीला लॉलीपॉप घेऊन देण्याचे आमिष दाखवून तिचे अपहरण करणाऱ्या आरोपीला ४८ तासांत पकडण्यात जुहू पोलिसांना यश आले आहे. जुहू पोलिसांनी या घटनेनंतर सहा तपास पथके स्थापन करून वांद्रे रेल्वे स्थानकावरून मुलीची सुखरूप सुटका केली. विलेपार्ले पश्चिम येथे राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेने जुहू पोलीस ठाण्यात बुधवारी त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याचे सांगितले होते. तक्रारदार महिला, त्यांचे पती व मुलगी त्यांच्या पतीच्या मित्राच्या घरी राहत होती. बुधवारी त्यांचे पती कामावर गेले असताना मुलगी लॉलीपॉपसाठी रडत होती. त्यामुळे आरोपी त्या मुलीला लॉलीपॉप घेऊन देण्यासाठी घेऊन गेला. तो परत आलाच नाही.

दुपारी तीनच्या सुमारास मुलीचे वडील घरी आले असता त्यांनीही मुलीचा व मित्राचा शोध घेतला. पण ते कोठेच सापडले नाहीत. अखेर त्यांनी याप्रकरणी जुहू पोलिसांकडे तक्रार केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन साहाय्यक पोलीस आयुक्त महेश मुगुटराव व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजितकुमार वर्तक यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके तयार करण्यात आली. या पथकांना विविध परिसरात अपहरण झालेल्या मुलीचा व आरोपीचा शोध घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्या अनुषंगाने पोलिसांनी परिसरातील सर्व सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रणाची तपासणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *