कुर्ला पश्चिम येथील सुभाष नगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील चाळीवर भिंत कोसळल्याने परिसरात खळबळ माजली. या घटनेत एका 18 वर्षीय तरुणीला आपला जीव गमवाावा लागला. सोमवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास सुभाष नगर येथील इमारतीच्या संरक्षक भिंतीचा भाग कोसळला आहे.ही संरक्षक भिंत खाली असलेल्या घरांवर पडली. अचानक झालेल्या या घटनेने नागरिक गोंधळून गेले. यामध्ये वैष्णवी प्रजापती या 18 वर्षीय तरुणीचा दुर्देवीरित्या मृत्यू झाला आहे.
सुभाष नगर येथील जैन सदन या इमारतीच्या संरक्षक भिंतीला लागून पाच घरे आहेत. यातील तीन घरांवर रात्री आठ वाजताच्या दरम्यान अचानक संरक्षक भिंत कोसळली. मध्यावर असलेल्या प्रजापती कुटुंबाच्या घरावर भिंतीचा मोठा भाग कोसळला.यात वैष्णवी चिरडली गेली आणि जागीच तिचा मृत्यु झाला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून बचावकार्य करण्यात आले. वैष्णवी ला बाहेर काढून पालिकेच्या राजावाडी रुग्णालय पाठविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेत तीन घरांचे ही मोठे नुकसान झाले आहे.
