मुंबई महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्यात प्रतिनियुक्तीवर असलेल्या तीन डॉक्टरांना अपुऱ्या मनुष्यबळामुळे पुन्हा रुग्णालयात बोलविण्यात आले आहे. मात्र त्यांची रुग्णालयात पाठवणी करण्यास मध्यवर्ती खरेदी खाते दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या डॉक्टरांवर कामाचा ताण येत आहे. तसेच औषध खरेदीच्या कामासाठी औषध निर्माण शास्त्राचे ज्ञान असलेल्या व्यक्तीऐवजी डॉक्टरांचा वापर का करण्यात येत आहे, असा प्रश्न रुग्णालयाकडून उपस्थित करण्यात येत आहे.
करोनामध्ये वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यकतेनुसार विविध विभागांमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठवले होते. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हे अधिकारी आपल्या मूळ आस्थापनेत पुन्हा रुजू झाले. मात्र महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्यामध्ये प्रतिनियुक्ती असलेल्या तीन वैद्यकीय अधिकारी अद्याप तेथेच काम करीत आहेत. यामुळे त्यांच्या मुळ आस्थापनेत मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला आहे.
परिणामी, या विभागातील अन्य अधिकाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन मुलुंडमधील म. तु. अगरवाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नोव्हेंबर २०२२ रोजी माध्यमिक आरोग्य सेवेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी व खातेप्रमुख यांच्याकडे, तर वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या कूपर रुग्णालय प्रशासनाने फेब्रुवारी २०२३ मध्ये संबंधित अधिकाऱ्यांना परत पाठविण्याची मागणी थेट मध्यवर्ती खरेदी खात्याकडे केली होती. मात्र या वैद्यकीय अधिकाऱ्यांना अद्यापही मुळ आस्थापनेत पाठविण्यात आलेले नाही. औषध खरेदीसाठी औषधांचे ज्ञान असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करण्याची गरज आहे. असे असताना या पदावर डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांवर अन्याय होत आहे, असे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील एका डॉक्टरने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
एका वैद्यकीय अधिकाऱ्याला महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये सहाय्यक अधिष्ठाता पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तरीही संबंधित वैद्यकीय अधिकारी मध्यवर्ती खरेदी खाते सोडून आपल्या मुळ आस्थापनेवर रूजू होण्यास तयार नाही.
