आतापर्यंत मुंबई महानगर प्रदेशातील २३७८ खड्डे बुजविल्याचा एमएमआरडीएचा दावा

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात आजच्या घडीला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून मेट्रोसह विविध प्रकल्प सुरू आहेत. या कामामुळे प्रकल्पालगतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडत असून त्यामुळे एमएमआरडीएला टीकेला सामोरे जावे लागत आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही नुकतेचे मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था होत असल्याचे म्हणत एमएमआरडीएला लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर पाऊस ओसरल्याबरोबर एमएमआरडीएने खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत एमएमआरमधील २३७८ खड्डे भरल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे.

पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर होतो आणि मुंबई महानगर पालिकेला टीकेला समोरे जावे लागते. अशावेळी एमएमआरडीएकडेही बोट दाखवले जाते. एमएमआरडीएच्या कामामुळे रस्त्यांवर खड्डे पडत असल्याचा आरोप होतो. या अनुषंगाने पावसाआधी सर्व कंत्राटदारांना खड्डे भरण्याचे आदेश दिले जातात. त्यानुसार खड्डे भरल्याचा दावा केला जातो. मात्र पावसाळ्यात एमएमआरडीएच्या प्रकल्पातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येते. यंदाही अशीच परिस्थिती आहे. एमएमआरडीएच्या मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात कामे सुरू असलेल्या रस्त्यांवर २७८३ खड्डे पडल्याची नोंद झाली आहे.

खड्ड्यांची संख्या पाहता पावसाची उघडीप सुरु होताच एमएमआरडीएने खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत २७८३ पैकी २३७८ खड्डे भरल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे. त्यामध्ये १४६७ खड्डे हे रस्ते प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ११२ किमी लांबीच्या भागातले असून त्यापैकी १३७३ खड्डे भरण्यात आले आहेत. प्रगतीपथावर असलेल्या मेट्रोच्या प्रकल्पांच्या अखत्यारीत येणाऱ्या १०० किमी रस्त्यांवर आतापर्यंत १३१६ खड्ड्यांची नोंद झाली आहे. या खड्ड्यांपैकी १००५ खड्डे बुजविण्यात आले आहेत. रस्ते प्रकल्पांतर्गत ९४ आणि मेट्रो प्रकल्पांतर्गत उर्वरित ३११ खड्डे भरण्याचे काम सुरु आहे. खड्डे भरण्याचे काम करण्यासाठी एमएमआरडीएने एका विशेष पथकाची स्थापना केली असून या पथकाने खड्डे भरण्याच्या कामाला वेग दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *