अभियंता, उद्योगपती सुधाकर प्रभू यांचे निधन

जागतिक कीर्तीचे अभियंता आणि उद्योगपती सुधाकर श्रीरंग प्रभू (वय ८७) यांचे लंडन येथे नुकतेच निधन झाले. प्रसिद्ध लेखिका डॉ. मीना प्रभू या त्यांच्या पत्नी होत. प्रभू यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. सुधाकर प्रभू हे मूळचे कोकणातील खानोली गावचे होते. व्हीजेआयटीतून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केल्यानंतर लंडनमधील ‘इंपेरिअल कॉलेज’मधून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. इंग्लंडमधील ‘पेल फ्रिशमन’ तसेच भारतातील ‘फ्रिशमन प्रभू’ या कंपन्यांचे ते भागीदार होते.

जगातील विविध देशांमध्ये प्रभू यांनी मोठमोठे प्रकल्प उभारले. भव्य इमारती, मेट्रो आणि महामार्गांची उभारणी करून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. इग्लंडमधील हॉटेल मेट्रोपोल, ड्रेपर्स गार्डनची इमारतही त्यांनीच साकारली. भारतात त्यांनी ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’ची इमारत उभारली.  सेंटर पॉईंट, या लंडनमधील  इमारतीच्या उभारणीबद्दल ‘इन्स्टिटय़ूट स्ट्रक्चरल इंजिनिअर्स’ या संस्थेकडून त्यांचा मानाच्या ‘ऑस्कर फेबर मेडल’ने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय युरोपातील सर्वांत उंच इमारत म्हणून गणल्या गेलेल्या ‘नॅशनल वेस्टमिनस्टर बँक टॉवर’ अर्थात टॉवर ४२ या इमारतीचे निर्माणही त्यांच्या प्रतिभेतून झाले.

 मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, दिल्ली मेट्रो या ठिकाणीही त्यांच्या फर्मची कन्सल्टंसी होती. नागपूरचा पहिला उड्डाणपूलही त्यांनी साकारला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसोबतच मुंबई ५ हाय ऑईल फिल्ड, पणजी मार्केट या प्रकल्पांना त्यांनी आकार दिला. वानखेडे स्टेडियम, तसेच बालेवाडी क्रीडा संकुलाचा प्रकल्प त्यांनी कनिष्ठ बंधू व प्रसिद्ध आर्किटेक्ट शशी प्रभू यांच्या समवेत पूर्णत्वास नेला.

एलिझाबेथ राणीच्या हस्ते सन्मान

सुधाकर प्रभू यांचे वडील श्रीरंग रघुनाथ प्रभू हे कुडाळ-देशकर आद्य गौड समाजाचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते होते. प्रामुख्याने मुंबई आणि डोंबिवलीत त्यांनी सामाजिक काम केले. त्यांचा हा वारसा पुढे नेत सुधाकर प्रभू यांनी अनेक संस्थांना देणग्या दिल्या. इंग्लंडमधील महाराष्ट्र मंडळासह अनेक संस्थांना त्यांनी सढळ हस्ते आर्थिक मदत केली. ब्रिटनमधून परदेशात निर्यात करण्याच्या योगदानासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा पुरस्कारही त्यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *