पुण्यातील कोथरुड पोलिसांनी १८ जुलै रोजी रात्री अडीच वाजता अॅक्सिस बॅक एटीएम समोर, बधाई चौक कोथरूड, पुणे येथून मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान वय २३ वर्षे आणि मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी वय २४ वर्षे, रा. ए/१, बिल्डींग फ्लॅट नं. १७, चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा, पुणे या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. ते दोघही मुळ रा. रतलाम मध्यप्रदेश मधील असल्याचं समोर आलं होतं. ते दोखे आणि त्यांचा पळून गेलेला साथीदार याच्या विरुध्द कोथरुड पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी गुन्हा दाखल करुन आरोपांना अटक केली होती. कोथरुड पोलिसांना अधिक तपासात अटक केलेल्या आरोपींवर एन. आय. ए. कडून गुन्हे नोंद करण्यात आले असून ते फरारी असल्याची माहिती मिळाली. आरोपीं विरुध्द प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले असल्याची माहिती मिळाली होती. या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी गुन्हयाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग केला होता. २२ जुलै रोजी कोथरुड पोलीस स्टेशनकडून गुन्हा वर्ग केल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने अटकेत असलेल्या आरोपींकडे तपास सुरु केला होता, अशी माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे शाखेकडून देण्यात आली होती.
दोन्ही आरोपींवर यु. ए. पी. ए. कलम लावल्यानंतर पोलीस कोठडी वाढवून घेण्यात आलेली आहे. दोन्ही आरोपींना पुण्यात आल्यानंतर ज्या व्यक्तीनं आश्रय देण्यासाठी त्यांची मदत केली, त्याचे नाव निष्पन्न झालेला असून त्याची सखोल विचारपूस केल्यानंतर २६ जुलै रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपींचा फरार झालेला साथीदार याचा तसेच गुन्हयातील अटक आरोपींना फरार कालावधीत सहाय्य करणाऱ्या व्यक्तीचा आणि गुन्हयाचा अधिक तपास दहशतवाद विरोधी पथकाकडील विविध पथके करीत आहे.
