आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये यापुढे सर्व उपचार मोफत

राज्यातील आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये  सर्व प्रकारचे उपचार तसेच चाचण्या आदी मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अगदी केस पेपरसाठी मोजावे लागणारे दहा रुपयेही घेण्यात येणार नसल्याचे आरोग्य विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी येणार आहे.

 राज्यात आरोग्य विभागाची जिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, स्त्री रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये तसेच उपजिल्हा रुग्णालये आणि मनोरुग्णालये आदी ५१७ रुग्णालये आहेत. याशिवाय १८७७ प्राथमिक आरोग्य केंद्रे व १०,७३५ आरोग्य उपकेंद्रे आहेत. आरोग्य विभागाच्या रुग्णालय सेवेअंतर्गत एकूण ४६,३११ खाटांची संख्या असून वर्षभरात तीन कोटींहून अधिक रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतात, तर सुमारे २७ लाख ८२ हजार ५८६ आंतररुग्ण असतात. लहान व मोठय़ा शस्त्रक्रिया मिळून आरोग्य विभागाच्या विविध रुग्णालयांमध्ये वर्षांकाठी सुमारे चार लाखांहून अधिक शस्त्रक्रिया केल्या जातात.

आरोग्य विभागात केस पेपर काढण्यासाठी दहा रुपये, रक्त तपासणीसाठी ३० ते ३०० रुपये, एक्स-रे साठी ७५ रुपये, सोनोग्राफीसाठी १०० रुपये, टाके घालण्यासाठी १०० रुपये, फिजिओथेरपीसाठी ३० रुपये, ड्रेसिंगसाठी १० रुपये तर मोठय़ा शस्त्रक्रियांसाठी ज्यात कर्करुग्णांचा समावेश आहे, त्यासाठी दोन हजार रुपये आकरण्यात येतात. ज्या रुग्णांकडून उपचार व केसपेपरसाठी पैसे आकारण्यात येतात त्यातून आरोग्य विभागाला सुमारे ७० कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळते. मात्र हे पैसे गोळा करण्यासाठी जी प्रशासकीय यंत्रणा व मनुष्यबळ वापरले जाते त्यापोटी होणारा खर्च ७० कोटी असल्याचे दिसून आले. ही यंत्रणा आरोग्य विभागात अन्यत्र वापरता येईल, हे लक्षात घेऊन आरोग्यमंत्र्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त धीरजकुमार तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्व उपचार मोफत करण्याची भूमिका मांडली असून याबाबतचा प्रस्ताव लवकरच मान्यतेसाठी मंत्रिमंडळापुढे आणण्यात येणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *