वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस’चं सध्या ओटीटी पर्व जोरदार सुरू आहे. ओटीटीचं हे दुसरं पर्व प्रक्षेकांच्या चांगलंच पसंतीस उतरलं आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली लोकप्रियता पाहून हे पर्व आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवण्यात आलं आहे. पण, दुसऱ्या बाजूला बिग बॉस ओटीटीमधून अभिनेता सलमान खानच गायब झाला आहे. त्याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. भाईजान बिग बॉस ओटीटीसह येणाऱ्या कुठल्याही पर्वाचं सूत्रसंचालन करणार नसल्याचा दावा केला जातं आहे. यामागचं कारण सिगारेट प्रकरण असल्याचं म्हटलं जात आहे.
गेल्या आठवड्यातील वीकेंडच्या वारमध्ये सलमान खानच्या हातात प्रेक्षकांनी सिगारेट पाहिली होती. त्यानंतर त्याचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आणि यामुळे तो ट्रोलिंगच्या जाळ्यात अडकला होता. काही लोकांनी भाईजानला पाठिंबा देत सिगारेट ओढण्यास काय चुकीचे आहे असं म्हटलं होतं.पण ‘बॉलीवूड लाईफ’च्या वृत्तानुसार, याच सिगारेट प्रकरणामुळे सलमानने बिग बॉस ओटीटीचं सूत्रसंचालन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय येणाऱ्या टेलिव्हिजनवरील बिग बॉसच्या १७व्या पर्वाचेही सलमान सूत्रसंचालन करणार नसल्याचाही दावा केला आहे. मात्र, याबाबत सलमान किंवा बिग बॉसच्या टीमनं अधिकृत भाष्य केलेलं नाही.
दरम्यान, १६ व १७ जुलैच्या झालेल्या वीकेंड वारमध्ये सलमानऐवजी कॉमेडिअन कृष्णा अभिषेक व भारती सिंह सूत्रसंचालन करताना दिसले होते. ज्या प्रकारे सलमान घरातील सदस्यांची खरडपट्टी काढतो किंवा त्यांना खेळण्याचे सल्ले देत असतो, ते भारती व कृष्णा एकत्र मिळूनही करू शकले नाहीत. पण, आता येणाऱ्या काळात खरंच सलमानने बिग बॉसचे सूत्रसंचालन सोडलं की नाही हे स्पष्ट होईल.
