सूरज चव्हाण यांची ‘ईडी’कडून चौकशी

करोना केंद्र गैरव्यवहाराप्रकरणी युवासेनेचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांची सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) सोमवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. या प्रकरणी ईडीने चव्हाण यांना समन्स बजावून सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. चव्हाण हे सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ईडीच्या बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात दाखल झाले. चव्हाण यांनी अनेक कंत्राटदारांना कंत्राटे मिळवून दिल्याचा आरोप आहे. शिवाय त्यांनी चढय़ा भावाने कंत्राट मिळवून दिल्याचाही त्यांच्यावर आरोप असून हे त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून केले? तसेच या प्रकरणी चव्हाण यांना किती आणि कसा नफा झाला, याची चौकशी ईडीतर्फे केली जात आहे.

खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय व्यावसायिक सुजीत पाटकर यांच्याविरोधात करोना केंद्र कंत्राट घोटाळय़ाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराची ईडी चौकशी करत असून त्याचाच भाग म्हणून २१ जून रोजी ईडीने मुंबईत १५ ठिकाणी छापे टाकले होते. त्यात चव्हाण यांच्या निवासस्थानासह महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या आणि प्रशासकीय अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या मालमत्तांचा समावेश होता.या छाप्यांमध्ये जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये अनियमितता आढळली असून मध्यस्थांच्या व्हॉट्सअ‍ॅप संदेशांमध्येही महापालिका अधिकाऱ्यांना पैसे दिल्याबाबतचे संभाषण आढळले आहे. शिवाय जप्त करण्यात आलेल्या एका डायरीतही महापालिका अधिकाऱ्यांना दिलेल्या पैशांच्या नोंदी आढळल्या आहेत, असा दावा ईडीने छाप्यानंतर केला होता. करोनाकाळात मुंबई महानगरपालिकेने दिलेली कंत्राटे चार ते पाच मध्यस्थांच्या माध्यमातून देण्यात आली. चव्हाण यांच्यासह यासीर फर्निचरवाला यांनी या प्रकरणात मध्यस्थ म्हणून काम केले, असेही ईडीचे म्हणणे आहे. ईडीला संशयित मध्यस्थांच्या रोख व्यवहाराबाबत माहिती मिळाली असून व्हॉट्सअ‍ॅप संभाषणामध्येही पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या रकमेबाबत संभाषण सापडले आहे. त्याआधारे या प्रकरणांमध्ये मध्यस्थांच्या सहभागाबाबतचे पुरावे ईडीला सापडले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *