विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा काटा काढल्याच्या अनेक बातम्या आपण वाचल्या आहेत. तसंच, प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीची हत्या केल्याचीही अनेक उदाहरणं आपल्यासमोर असतील. परंतु, नव्या नात्यात अडथळा ठरत असल्याने एका मुलीने चक्क तिच्या एक्स बॉयफ्रेंडची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. उत्तर प्रदेशच्या वाराणसीत हा प्रकार घडला आहे.
देवांश यादव आणि अनुष्का तिवारी लहानपणापासूनचे एकमेकांचे मित्र होते. ते दोघेही कानपूरच्या सरस्वती इंटर कॉलेजमध्ये बारावीपर्यंत एकत्र शिकले. त्यानंतर, दोन वर्षे हे दोघेही लिव्ह इनमध्ये राहत होते. परंतु, त्यानंतर या दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याने दोघेही वेगळे झाले. दरम्यान अनुष्का आता राहुल सेठी याच्यासोबत प्रेमसंबंधांत आहे.
परंतु, देवांश अनुष्काला सतत त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून अनुष्काने त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला. या हत्येसाठी तिने तिच्या नव्या प्रियकराची मदत घेतली. तसंच, प्रियकराच्या एका मित्रानेही त्यांना मदत केली.अनुष्काने देवांशला वाराणसी येथे भेटायला बोलावले. त्याला एका कारमध्ये बसवलं. ते कारने सादाब येथे गेले. प्रथम अनुष्काने देवांशला विषारी ज्यूस पाजले. यामुळे देवांश बेशुद्ध झाला. चंदौलीच्या अलीनगर येथे जाऊन रात्री राहुल सेठीने त्याच्यावर गोळी झाडली. हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तुल जप्त करण्यात आले असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे.
