पुणे: चिमुरडा २३ दिवसांनी मृत्यूच्या दाढेतून परत

शेतमजुराच्या तीन वर्षांच्या मुलाने शेतात खेळताना चुकून कीटकनाशक प्यायले. मुलाच्या तोंडातून फेस येऊ लागल्यानंतर ही बाब लक्षात आली. त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले. मुलगा अत्यवस्थ असल्याचे सांगत त्या रुग्णालयाने मोठ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. अखेर त्या मुलाला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल २३ दिवसांच्या उपचारानंतर हा मुलगा बरा होऊन घरी परतला आहे.

मुळशी तालुक्यातील भादस या गावात हे शेतमजूर दांपत्य राहते. काही दिवसांपूर्वी ते शेतात मशागतीची काम करीत होते. त्यावेळी मुलगा तिथेच खेळत होता. त्याने खेळताना शेतात पडलेली कीटकनाशकाची बाटली तोंडाला लावली. काही वेळानंतर एका व्यक्तीचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्यावेळी त्याच्या तोंडातून फेस येत होता. त्यावेळी मुलाने काही तरी खाल्ल्याचे लक्षात आले. त्याच्या तोंडाला कीटकनाशकाचा वासही येत होता.

पालकांनी दुचाकीवरून त्याला गावापासून दहा किलोमीटर अंतरावरील पौड रुग्णालयात नेले. मूल अत्यवस्थ असल्याने उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी मुलाला घेऊन ससून रुग्णालयात धाव घेतली. ससूनमधील डॉक्टरांनी तातडीने मुलावर उपचार सुरू केले. त्याच्यावर पाच ते सहा दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. नंतर त्याला सर्वसाधारण कक्षात हलवण्यात आले. अखेर २३ दिवसांच्या उपचारानंतर त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

ससूनमधील डॉक्टरांनी या काळात मुलाच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले होते. त्याच्या प्रकृतीत होत असलेल्या चढउतारानुसार उपचाराची दिशा ठरवली जात होती. अखेर तो ठणठणीत बरा होऊन रुग्णालयातून घरी गेला. ससूनच्या बालरोगशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. आरती किणीकर, डॉ. शलाका पाटील, डॉ. नरेश सोनकवडे, डॉ. पंकज कुमावत आणि डॉ. गोकुळ बावस्कर यांच्या पथकाने या मुलावर उपचार केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *