कांदिवली पूर्व येथे ७ वर्षांच्या मुलीशी गेल्या वर्षभरापासून असभ्य वर्तन करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली. हा प्रकार कोणालाही सांगितल्यास गळा कापून टाकण्याची धमकी आरोपीने दिली होती. त्यामुळे मुलगी घाबरली होती. याप्रकरणी विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी राहत असलेल्या सोसायटीमध्ये काम करणारा ४५ वर्षीय सुरक्षा रक्षक गेल्या एक ते दीड वर्षांपासून पीडित मुलीला असभ्यरित्या स्पर्श करत होता. हा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसाकडे तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल गेऊन तत्काळ गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी राहत्या घरातून सुरक्षा रक्षकाला अटक केली.
आरोपीने पीडित मुलीला गळा कापून टाकण्याची धमकी दिली होती. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पीडित मुलीने हा प्रकार कोणलाही सांगितला नाही. नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीने आईला हा प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
