स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक मासेमारी बोट ग्रीसच्या दक्षिण किनाऱ्याजवळ बुडाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (१४ जून) घडली आहे. ही बोट बुडताना स्थलांतरितांनी बचावकार्य करणाऱ्या बोटींची मदत नाकारल्याचे म्हटले जात आहे. लिबिया, सीरिया आदी भागांतील नागरिक युरोपात जाण्यासाठी धडपडत असतात. जीव धोक्यात घालून हे लोक प्रवास करतात. लिबिया किंवा ट्युनिशियापासून उत्तर युरोपात जाण्यासाठी स्थलांतरित लोक मध्य भूमध्य सागराच्या मार्गाने प्रवास करतात. संयुक्त राष्ट्राच्या ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ मायग्रेशन’ संस्थेनुसार हा मार्ग सर्वाधिक धोकादायक जलमार्गांपैकी एक आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रीसच्या दक्षिण किनाऱ्यावर ही घटना नेमकी कशी घडली? या दुर्घटनेत किती लोकांना जलसमाधी मिळाली? युरोपात निर्वासितांची समस्या गंभीर का होत चालली आहे? यावर टाकलेला प्रकाश…
ग्रीसमध्ये नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार पूर्व लिबियाच्या तोब्रुक भागातून स्थलांतरितांना घेऊन एक मासेमारी बोट इटलीला जात होती. मात्र ही बोट बुधवारी (१४ जून) दक्षिण पेलोपोनिस द्वीपकल्पाच्या नैर्ऋत्येस उलटली. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यामुळे या बसला अपघात झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत ७९ जणांना जलसमाधी मिळाली आहे. तर १०४ प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. बोटीमध्ये एकूण किती लोक होते आणि किती लोक बेपत्ता आहेत, हे अद्याप अस्पष्ट आहे. प्राथमिक माहितीनुसार या बोटीमध्ये शेकडो लोक प्रवास करत होते. ही दुर्घटना आतापर्यंतच्या सर्वाधिक भीषण दुर्घटनांपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे.
प्रवाशांनी खरंच मदत नाकारली?
दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रीस तटरक्षक दल, नौदल, व्यापारी जहाजे तसेच विमानांच्या माध्यमातून बचावकार्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तटरक्षक दलातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बुडत असलेल्या जहाजाने कोणाकडूनही मदत घेण्यास नकार दिला. आम्ही मदत करण्यास तयार असताना जहाजाच्या कॅप्टनला मात्र इटलीकडे जायचे होते, असे तटरक्षक आणि व्यापारी जहाज विभागाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. संकटात असलेल्या स्थलांतरितांच्या बोटींना ‘अलार्म फोन’ या संस्थेकडून मदत केली जाते. या संस्थेने ग्रीसच्या दक्षिण किनाऱ्यावरील या दुर्घटनेबाबत अधिक माहिती दिली आहे. बोटीमध्ये असलेले काही लोक त्यांच्यासारख्याच काही स्थलांतरितांच्या संपर्कात होते. त्या लोकांना मदत हवी होती. आमची बोट एका छोट्या बोटीवर आदळली. त्यामुळे हा अपघात घडला, असे बोटीतील स्थलांतरितांनी सांगितले, असे ‘अलार्म फोन’ या संस्थेने सांगितले आहे. बरेच स्थलांतरित आपल्या ईप्सितस्थळी जाण्यासाठी ग्रीसमध्ये न जाता थेट इटलीला पोहोचतात. अन्य स्थलांतरितांकडे, कुटुंबीयांकडे सहजपणे पोहोचता यावे आणि प्रवास अडथळ्यांविना व्हावा म्हणून हा मार्ग निवडला जातो.
