जिल्हाभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे लाचखोर सरकारी बाबूंवर धडक कारवाई केली जात आहे. मात्र, तरीही बाबूंची लाचखोरी थांबत नसल्याचे मंगळवारी येवला व मालेगावमध्ये झालेल्या कारवाईवरून स्पष्ट झाले.
येवला तालुका पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या विजय नारायण शिंदे (वय ५१) या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकास तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी तालुका पोलिस ठाण्याच्या आवारात सापळा रचून ही कारवाई केली.
काय आहे प्रकरण?
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिन्यांपासून धडक मोहिमा राबवत शासकीय यंत्रणेतील लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. मंगळवारी अशाच पद्धतीने सापळा रचत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने येवला तालुका पोलिस ठाण्यामधील लाचखोर सहाय्यक उपनिरीक्षक विजय नारायण शिंदे याला ताब्यात घेतले. तक्रारदारांच्या पत्नीने येवला तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या अदखलपात्र (एनसी) तक्रारीवरून समोरच्यांवर कारवाई करण्यासाठी व तक्रारदार यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या एनसी व तक्रार अर्जानुसार दखलपात्र गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात शिंदे याने चार हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी येवला तालुका पोलिस ठाण्याच्या आवारात सापळा रचला. यावेळी लाचेच्या चार हजार रुपयांच्या मागणीपैकी पहिला हप्ता म्हणून तीन हजार रुपये स्वीकारताना शिंदे पकडला गेला. त्याच्याविरोधात येवला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलिस नाईक राजेश गिते, शरद हेंबाडे, अनिल राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
