आईकडे जमिनीचे पैसे येताच मुलाला हाव सुटली, स्वाभिमानी पत्नीने नकार देताच नवऱ्याने गळाच पकडला

आजकाल जमिनीचे वाद हे कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. असाच एक वाद डोंबिवलीत समोर आला आहे. जमिनीच्या वादातून एक पत्नीने आपल्या पत्नीचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.संतोष म्हसकर असे मारहाण करणाऱ्या पतीचे नाव असून या प्रकरणी मानपाडा पोलीसांनी गुन्हा दाखल करत आरोपी पतीला अटक केली आहे.

डोंबिवलीमधील मुक्ताई कॉलनी भोपर कमानी जवळ संतोष म्हसकर आपल्या कुटुंबासह राहतो. संतोषच्या आईला तिच्या माहेरुन जमिनीचा हिस्सा मिळाला होता. ही जमीन विकल्याने तिच्याकडे पैसे आले होते. ‘जमिनीतून आलेले पैसे मला दे’, असा तगादा संतोषने आपल्या आईकडे लावला होता. संतोष याला दारूचे व्यसन असल्याने त्याची आई त्याला पैसे देणं टाळत होती. याच मुद्द्यावरून संतोष आणि त्याची पत्नी सुहासिनी यांच्यात वाद झाला. यावेळी दारू पिता तर पैसे कशाला पाहिजेत?, आपल्याला त्यांचे पैसे नको, असे सुहासिनीने त्याला म्हटले.पत्नीच्या अशा बोलण्याचा राग आल्याने संतोषने तिला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. इतकेच नाही तर तिचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. याचवेळी घरात होणारा वाद पाहताच शेजारच्याने घरात धाव घेत सुहासिनीचा जीव वाचवला. त्यानंतर सुहासिनीने आपल्या कुटुंबासह पोलिसांकडे धाव घेत पतीच्या विरोधात मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली. त्याधारे पोलिसांनी संतोष म्हसकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर मानपाडा पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपी संतोषला अटक केली असून पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *