फुगे विकण्यावरून वाद, संताप अनावर झाला; चाकूचे वार, रेल्वेस्थानकावर थरार

नाशिक रोडच्या सिन्नर फाटा येथे किरकोळ कारणातून रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक ४ बाहेर एका २१ वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना काल सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. खून केल्यानंतर आरोपी फरार झाला. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ बाहेर फुगे विक्रेत्यांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर संशयित आरोपी आदित्य नागेश शिंदे याने आणि त्याच्यासोबत असलेल्या नातेवाईकांनी अजय काळे (वय २१) या युवकावर चाकूने वार केले. चाकूचे वार वर्मी लागल्याने अजयला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र,उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संशयित आरोपीने शकील उदास भोसले याच्यावर हल्ला केला, त्यात संबंधित युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बिटको हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस दाखल होताच पळापळ झाली. याचा फायदा घेत संशयीत आरोपी आदित्य नागेश शिंदे याने भुसावळकडे जाणाऱ्या चालत्या रेल्वे गाडीत उडी घेत पलायन करण्याच्या प्रयत्न केला. नाशिक रोड गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत चालत्या ट्रेन मध्ये उड्या घेतल्या. यावेळी बोगीमधून पळत असणाऱ्या आदित्यला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
मयत अजय काळे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार असून काळे हा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात असलेल्या गंगापूर तालुक्यात वास्तव्यास होता.किरकोळ कारणातून झालेला वाद हा टोकाला गेल्याने या घटनेत एका २१ वर्षीय फुगे विक्रेत्याला आपला जीव गमवावा लागला आहे. या खुनाच्या घटनेने नाशिक रोड परिसर हादरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *