मुलीशी बोलल्याने अल्पवयीन मुलाला पट्टा, प्लास्टिकच्या पाइपने मारहाण, आरोपी दोषी, मात्र एक हजाराच्या दंडाची शिक्षा

मुलीशी बोलल्याच्या कारणास्तव १५ वर्षांच्या मुलाला कंबरेचा पट्टा आणि प्लास्टिकच्या पाइपने मारहाण केल्याबद्दल सत्र न्यायालयाने एकाला दोषी ठरवले. मात्र आरोपीला कारावासाची शिक्षा सुनावण्याऐवजी न्यायालयाने त्याला एक हजार रुपयांचा दंड सुनावला. न्यायालयाने आरोपीच्या पत्नीची या प्रकरणातून निर्दोष सुटका केली.

तक्रारदाराने नोंदवलेल्या तक्रारीचा विचार करता तक्रारदार आणि आरोपीच्या मुलीतील प्रेमसंबंधांवरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद सुरू होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर गुन्ह्याचे स्वरूप आणि एकूण वस्तुस्थिती लक्षात घेता आरोपीला दंडात्मक शिक्षा देणे योग्य आहे, असे न्यायालयाने उपरोक्त आदेश देताना नमूद केले.

 तक्रारदार मुलाच्या तक्रारीनुसार, घटनेच्या वेळी तो महाविद्यालयात शिकत होता. त्याआधी शाळेत शिकत असताना विशेषत: शिकवणी वर्गाला जात असताना त्याची आरोपीच्या मुलीशी ओळख झाली. पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. या प्रेमसंबंधांबाबत कळल्यावर आरोपीच्या मुलीच्या पालकांनी त्याला समज दिली आणि मुलीशी संपर्क न साधण्याचे बजावले. त्यानंतर तक्रारदाराने आरोपीच्या मुलीशी संपर्क साधणे बंद केले.

घटनेच्या दिवशी म्हणजेच १३ मे २०१५ रोजी मुलगी तिच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीत उभी होती. त्यावेळी मुलीने तक्रारदाराला तेथे बोलावले व दोघे तेथे बोलत होते. ते दोघे बोलत असल्याचे पाहताक्षणी आरोपी तेथे गेला. त्यानंतर त्याने दोघांना घरी नेले. तसेच कंबरेचा पट्टा आणि प्लास्टिकच्या पाइपने तक्रारदाराला मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने आपल्याला धमकावल्याचा आरोपही तक्रारदाराने तक्रारीत केला होता.

मारहाणीच्या प्रकारानंतर मुलाने भावाला फोन करून आई-वडिलांना आरोपीच्या घरी बोलावले. या सगळ्या प्रकारानंतर लोकही आरोपीच्या घराबाहेर जमा झाले होते. तक्रारदाराचे पालक आरोपीच्या घरी पोहोचल्यानंतर आणि मुलाला आरोपीने दिलेली वागणूक कळाल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांत शाब्दिक वाद झाला. प्रकरण नागपाडा पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. तेथे तक्रारदाराने आरोपीविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली. याप्रकरणी तक्रारदार आणि त्याच्या भावाने आरोपीविरोधात न्यायालयात साक्ष दिली. न्यायालयानेही तक्रारदाराची साक्ष आरोपीला त्याच्यावरील आरोपांत दोषी ठरवताना ग्राह्य मानली. तक्रारदाराने अखेरपर्यंत पोलिसांना दिलेला जबाब कायम ठेवला. तसेच आरोपींने केलेल्या मारहाणीनंतर रुग्णालयात घेतलेल्या उपचारांची कागदपत्रेही न्यायालयात सादर केली. या सगळ्या बाबी आरोपींवरील आरोप सिद्ध करतात, असे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवताना नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *