“५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर तैनात करू नका”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

सध्या महाराष्ट्रासह देशभरात उन्हाचा पारा प्रचंड वाढत आहेत. त्यामुळे दुपारच्या उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेडची आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावे. तसेच ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर उन्हात कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिले.

आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. बुधवारी दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री शिंदे ठाणे येथून मुंबईकडे मार्गक्रमण करत होते. यावेळी भर उन्हात जागोजागी कर्तव्य बजावत असलेले वाहतूक पोलीस त्यांना दिसले. यामध्ये अनेक पोलीस वयाने ज्येष्ठ होते.

 त्यामुळे यापुढे ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांना भर उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच या वाहतूक पोलिसांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांना छत्री, जागोजागी उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी तात्पुरत्या शेड्स आणि पिण्याचे पाणी पुरवण्याची सूचना केली. यापुढे ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांना तसेच कोणताही गंभीर आजार असलेल्या वाहतूक पोलिसांना उन्हात कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *