शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जालन्यात जेलभरो आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुप्रियांसोबतच फौजीया खान, राजेश टोपे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
राष्ट्रवादीच्या जेलभरो आंदोलनाला मराठवाड्यातून सुरुवात झाली आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात मराठवाड्यात राष्ट्रवादी नेत्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. जालन्यात राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री राजेश टोपे यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं. जालन्यातल्या आंदोलनाला शेतकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद पहायला मिळाला.
दुसरीकडे परभणीमध्ये विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी जेलभरो आंदोलनाचं नेतृत्व केलं. बैलगाडीवरुन मोर्चा काढून युती सरकारच्या शेतकरी धोरणांचा यावेळी निषेध करण्यात आला.
औरंगाबादमध्ये विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटलांनी नेतृत्व केलेल्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात जनावरं उभी करुन त्यांना चारा खायला घातला.

